मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल हाती येत असताना शहरातील राजकीय रणधुमाळी अधिकच रंगतदार झाली आहे. ठाकरे बंधू विरुद्ध शिवसेना–भाजप युती असा स्पष्ट संघर्ष दिसत असताना प्रभाग क्रमांक २ मधील निकालाने विशेष लक्ष वेधून घेतले. एकेकाळच्या घट्ट राजकीय मैत्रिणींमध्ये झालेल्या या लढतीत भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी निर्णायक आघाडी घेत बाजी मारली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या धनश्री कोलगे आणि काँग्रेसच्या मेनका गिरीश सिंह यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांना १६,४८४ मते मिळाली, तर धनश्री कोलगे यांना ५,७२९ मते मिळाली. या निकालामुळे प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपचा वरचष्मा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
ठाकरेंना सोडून भाजपाचा मार्ग
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. पक्षातील फाटाफुटीनंतरही त्या बराच काळ ठाकरे गटासोबत राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या निष्ठेची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली.
पक्षबदलानंतर मतदारांचा कौल काय लागतो, निष्ठा मोडल्याचा फटका बसतो की पूर्वीच्या कामाचा फायदा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर निकालाने या प्रश्नाचे उत्तर दिले असून घोसाळकर यांनी स्पष्ट विजय नोंदवला आहे.
‘विकासावर विश्वास होता’
विजयानंतर प्रतिक्रिया देताना तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “माध्यमांना ही लढत अटीतटीची वाटत होती; मात्र मला स्वतःला माझ्या कामावर आणि विकासावर विश्वास होता.” प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि लोकोपयोगी कामांमुळे मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचा त्यांनी दावा केला.
मालमत्तेचा तपशील चर्चेत
तेजस्वी घोसाळकर यांनी संगणक अनुप्रयोग (कम्प्युटर अॅप्लिकेशन) विषयात पदवी घेतली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार २०१७ मध्ये त्यांची एकूण मालमत्ता २५ लाख ८२ हजार रुपये होती. सध्याच्या प्रतिज्ञापत्रानुसार ही मालमत्ता वाढून सुमारे ५ कोटी १५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय ८५ लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोने त्यांच्या नावावर आहे. अलिकडेच ४० लाख रुपये किमतीची वाहन खरेदी केल्याची नोंदही प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक २ मधील हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता, पक्षांतर आणि मतदारांचा कल यावरही महत्त्वाची छाया टाकणारा ठरला आहे.


