कऱ्हाड प्रतिनिधी
क्षणाचाही विचार न करता सुमारे १४० फूट उंच पुलावरून थेट कृष्णा नदीपात्रात उडी घेत एका नवविवाहितेचे प्राण वाचविण्याची थरारक घटना कऱ्हाडमध्ये मंगळवारी दुपारी घडली. पुण्याहून गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या अरुण ज्ञानदेव जाधव (३०) या युवकाने दाखविलेल्या धाडसामुळे आणि स्थानिक युवकांच्या तत्पर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.
दुपारी दीडच्या सुमारास कृष्णा नदीच्या पुलावर अचानक बघ्यांची गर्दी जमली होती. नदीपात्रात एका महिलेने उडी घेतल्याची माहिती समजताच अनेकांच्या नजरा खाली खिळल्या. याच वेळी अरुण जाधव हे डिलिव्हरी आटोपून पुण्याच्या दिशेने परत जात होते. पुलावरील गर्दी पाहून त्यांनी वाहन थांबवले. खाली पाहताच काही क्षणांपूर्वीच नदीत उडी घेतलेल्या नवविवाहितेची धडपड त्यांच्या नजरेस पडली.
परिस्थितीची तीव्रता ओळखून जाधव यांनी कोणताही विचार न करता अंगावरील कपड्यांसह थेट नदीपात्रात उडी घेतली. सुमारे १४० फूट उंचीवरून घेतलेली ही उडी पाहून उपस्थित क्षणभर स्तब्ध झाले. उडी घेतल्यानंतर त्यांनी महिलेचे केस पकडून तिला पाण्यावर धरून ठेवले.
दरम्यान, कऱ्हाडमधील सागर पाटील (रा. रैनाक गल्ली) हा पट्टीचा पोहणारा युवक मदतीसाठी नदीत उतरला. दोघांनी मिळून महिलेला नदीकाठाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नात गोपाळ निलजकर, प्रेम ओहाळ, पवन जावळे, योगेश राजोळे, भारत जावळे व कुमार जावळे या युवकांनीही धाडस दाखवत नदीपात्रात उडी घेतली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून महिलेला सुरक्षितपणे काठावर आणण्यात यश आले.
महिलेच्या शरीरातील पाणी बाहेर काढल्यानंतर तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळातच ती शुद्धीवर आली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, महिला वाचविल्यानंतर अरुण जाधव तेथून निघून गेले होते. मात्र उपस्थित नागरिकांनी त्यांची ओळख पटवून संपर्क साधला. त्यांना उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात बोलावण्यात आले. जाधव यांच्यासह सागर पाटील यांच्यावरही उपचार करण्यात आले. पाटील यांच्या पायाला काच लागली असून पाठीत वेदना होत असल्याचे समजते.
“नदीत महिला बुडताना दिसल्यानंतर शांत बसणे शक्य नव्हते. पोहता येते, तर तिचा उपयोग कोणाचे तरी प्राण वाचविण्यास व्हावा, इतकाच विचार होता,” अशी प्रतिक्रिया अरुण जाधव यांनी दिली.
या घटनेमुळे कऱ्हाडमध्ये माणुसकी, धैर्य आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत प्रत्यय नागरिकांना अनुभवता आला. संकटाच्या क्षणी अनोळखी व्यक्तीसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या युवकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


