मुंबई प्रतिनिधी
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी थांबला. गल्लीबोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत सुरू असलेला कर्णकर्कश प्रचार, सभा, रॅली आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता शांत झाल्या असून गुरुवार, 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी शुक्रवारी, 16 जानेवारी रोजी पार पडणार आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील 2,869 जागांसाठी तब्बल 15,931 उमेदवार रिंगणात असून, जवळपास नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सर्व पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून शेवटच्या काही दिवसांत प्रचाराने टोक गाठले होते.
दरम्यान, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटप, भेटवस्तू देण्याचे प्रकार उघडकीस आले. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने कडक निर्बंध लागू केले असून मतदानाच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
• मतदारांनी काय करावे?
मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र (Voter ID) सोबत ठेवावे.
मतदार माहितीची स्लिप (मतदान केंद्राची माहिती असलेली) असल्यास सोबत न्यावी. स्लिप नसेल तरी चिंता करण्याचे कारण नाही; ती मतदान केंद्रावर उपलब्ध असेल.
खालीलपैकी कोणतेही एक वैध फोटो ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहे
आधार कार्ड
मनरेगा जॉब कार्ड
फोटोसह बँक पासबुक
ड्रायव्हिंग लायसन्स
केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा ओळखपत्र
पॅन कार्ड
पासपोर्ट
फोटोसह पेन्शन दस्तऐवज
एनपीआर अंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड
कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
खासदार, आमदार किंवा विधानपरिषद सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र
• मतदारांनी काय करू नये?
मतदान केंद्रावर मोबाइल फोन घेऊन जाऊ नये. आवश्यक असल्यास फोन पूर्णपणे बंद (स्विच ऑफ) ठेवणे बंधनकारक आहे.
ज्वलनशील किंवा धारदार वस्त – जसे की लायटर, चाकू आदी – सोबत बाळगू नयेत.
कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत किंवा त्यावर विश्वास ठेवू नये. संशयास्पद माहिती आढळल्यास प्रशासनाला कळवावे.
मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रचार करण्यास सक्त मनाई आहे. कोणतेही फलक, पॅम्प्लेट, घोषणाबाजी किंवा मतदारांना प्रभावित करणाऱ्या कृती निषिद्ध आहेत.
प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना वैयक्तिक भेटींची मर्यादित मुभा असली, तरी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन प्रचार करता येणार नाही.
इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया आणि एसएमएसद्वारे प्रचारावर पूर्ण बंदी लागू आहे.
निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लोकशाहीचा उत्सव शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावा, यासाठी मतदारांनी जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


