ठाणे प्रतिनिधी
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली. “पूर्वीचा भाजप मेलाय, आताचा भाजप फक्त सत्तेचा आणि पैशांचा व्यापारी झाला आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
सध्याच्या राजकारणात उमेदवारी मागे घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या ऑफर दिल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी पैशांना नकार देत निवडणूक लढवणाऱ्या ‘ज्योती ताई’ यांना मंचावर बोलावून त्यांचे कौतुक केले. “पैशांना न झुकणं हीच खरी लोकशाही आहे,” असे ते म्हणाले.
‘ही शेवटची निवडणूक ठरू शकते’
“सामान्य जनतेसाठी ही शेवटची निवडणूक ठरू शकते,” असा इशारा देत उद्धव ठाकरे म्हणाले की, “यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील, असं वाटत नाही. महापौर कोण होणार, हेही ठरवण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांकडे राहील की नाही, हा प्रश्न आहे.”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. “एकत्र का येत नाही, असा प्रश्न विचारला जायचा. आता आलो तरीही प्रश्न संपले नाहीत. पण मराठी माणसाला जागं करण्यासाठी ही युती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाषा, अस्मिता आणि ‘गद्दारी’वर घणाघात
“मराठीबाबत बोललं की लगेच इतर भाषिकांचं काय, असा सवाल केला जातो. पण आमच्या घरात जो दादागिरी करतो, त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं नाही तर छत्रपतींचं राज्य कसलं?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
“मराठी माझी आई आहे, हिंदी माझी मावशी आहे. पण आई मेली तरी चालेल, अशी मानसिकता असणारे लोक महाराष्ट्रात कसे चालतात?” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि फुटीर गटावर निशाणा साधला.
शिंदे–भाजपवर थेट टीका
“जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतो, तोच माणूस ठाण्याशीही गद्दारी करतो,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केले. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक यांचाही त्यांनी समाचार घेतला.
“बिबट्यांसाठी ‘शूट अॅट साइट’चे आदेश दिले जातात, पण जंगलाची जमीन सही करून विकणाऱ्यांवर ‘शूट अॅट साइन’ची हिंमत वनमंत्री दाखवणार का?” असा खोचक सवाल त्यांनी केला.
ठाण्याचा विकास आणि बाळासाहेबांची आठवण
ठाण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कधीकाळी ठाण्यात बैलगाडीतून प्रचार व्हायचा. २०१२ च्या शेवटच्या महापालिका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी ठाण्याला विशेष महत्त्व दिलं होतं. ‘एक सभा मुंबईत आणि एक माझ्या ठाण्यात,’ असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं.”
ठाण्यातील नाट्यगृह, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आणि गडकरी रंगायतन यांचा उल्लेख करत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकाळातील विकासकामांची आठवण करून दिली.
पोस्टर, पर्यावरण आणि ‘विनाशाची गती’
ठाण्यात लावण्यात आलेल्या सरकारी पोस्टरवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ही विकासाची नाही, तर विनाशाची गती आहे.” मुलुंड मेट्रो प्रकल्पामुळे पर्यावरणावर निर्माण झालेल्या संकटाकडे लक्ष वेधत त्यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली.
“आज मुंबईत श्वास घ्यायलाही त्रास होतो. उद्या काही झालं तर हे गद्दार हेलिकॉप्टरने पळून जातील, कुणी नागपूरला, कुणी दिल्लीला,” असा आरोप त्यांनी केला.
बीएमसीचा खजिना आणि कर्जाचा डोंगर
मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बीएमसीच्या ठेवी ९२ हजार कोटींपर्यंत होत्या. त्यातून ७० हजार कोटी काढण्यात आले. आता महापालिकेच्या डोक्यावर सुमारे ३ लाख कोटींचं कर्ज आहे. पैसा परत कुठून येणार?”
ऑक्ट्रॉय बंदी, उद्योगांचे गुजरातकडे स्थलांतर आणि केंद्राच्या धोरणांवर टीका करत त्यांनी आरोप केला की, “इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही, तेवढं भाजप सत्तेच्या जोरावर लुटत आहे.”
नगरसेवक पदासाठी कोट्यवधी रुपये वाटले जात असल्याचा आरोप करत, “हा पैसा कुणाच्या खिशातून येतो?” असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण संपवले.


