सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहरात बुधवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. न्यू संतोष नगर पोलिस लाईन परिसरात राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अश्विनी सिलसिद्ध सलगर (वय अंदाजे ३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नी होत्या. बुधवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे पती नाईट ड्युटीवर असल्याने त्या वेळी घरी नव्हते. घरात अश्विनी आणि त्यांची दोन लहान मुले होती. मध्यरात्री मुलं झोपलेली असताना अश्विनी यांनी त्यांच्यासोबत एक सेल्फी काढून तो जवळच्या नातेवाईकाला पाठवला तसेच फोन करून आपण जीवन संपवत असल्याची माहिती दिली. यापूर्वीही अशा स्वरूपाचे फोन येत असल्याने नातेवाईकांनी त्याकडे गंभीरतेने पाहिले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
मात्र पहाटे नातेवाईकांनी मेसेज पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने अश्विनी यांच्या पतीला माहिती दिली. पतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडून आत प्रवेश केला असता अश्विनी यांनी साडीच्या साह्याने सिलिंगच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले.
त्यांना तातडीने खाली उतरवून सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी ज्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात पती कार्यरत आहेत, त्याच ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


