नागपूर प्रतिनिधी
दक्षिण भारतीय थ्रिलर चित्रपटांतील कथानकावरून प्रेरणा घेत रचण्यात आलेला ५० लाख रुपयांच्या खंडणीचा सिनेस्टाईल कट नागपूर पोलिसांनी वेळीच हाणून पाडला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या प्रकरणात भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बहिणीच्या लग्नासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या मुख्य आरोपीने चित्रपटातील पद्धतीचा अवलंब करून हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार प्रकाश ढगे हे भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. १७ डिसेंबर रोजी भंडाऱ्यातील काम आटोपून ते नागपूरकडे परतत असताना वेळाहरी बायपास रोडवर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची कार अडवली. कारच्या मागील काचा तसेच समोरील दरवाज्याच्या काचा फोडून आरोपींनी दहशत निर्माण केली आणि घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेनंतर दोन दिवसांनी, १९ डिसेंबर रोजी ढगे यांना अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला. “तुला मारण्यासाठी २० लाखांची सुपारी देण्यात आली आहे. जीव वाचवायचा असेल तर ५० लाख रुपये दे,” अशी थेट धमकी देत आरोपींनी जबलपूर रिंगरोडवरील महादेव ढाब्यावर पैसे आणण्यास सांगितले. या धमकीने ढगे आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रसंगावधान राखत ढगे यांनी तात्काळ बेलतरोडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. खंडणी देण्याचा बनाव करत बनावट नोटांनी भरलेली बॅग ढगे यांच्याकडे देऊन ठरलेल्या ठिकाणी पाठवण्यात आले. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी बॅग घेऊन पसार झाले.
यानंतर आरोपींनी वारंवार सिमकार्ड आणि मोबाईल फोन बदलत ढगे यांना वेगवेगळ्या ठिकाणी पैसे आणण्यास सांगण्यास सुरुवात केली. २९ डिसेंबर रोजी पुन्हा फोन करून ढगे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले.
नागपूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत छापे टाकून अखेर सर्व आरोपींना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अतुल अनिल तागडे (वय ३०, रा. देवरी, गोंदिया), राहुल मीताराम पटले (वय २१), हिंदुस्तान वासुदेव रामटेके (वय २७), निखिल राजू नांदेकर (वय २८) आणि प्रेक्षा बाबू कांबळे (वय ३०) यांचा समावेश आहे.
पोलिस तपासानुसार, अतुल तागडे हा देवरी येथे मोबाईल शॉपी चालवतो. बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या तागड्याने खंडणीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रेक्षा कांबळे ही त्याची मावस बहीण असून ती भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. कार्यालयीन माहितीच्या आधारे ढगे यांच्याकडे मोठी अवैध संपत्ती असल्याची माहिती तिने तागड्याला दिल्याचा आरोप आहे. याच माहितीच्या आधारे ढगे यांना लक्ष्य करून सिनेस्टाईल खंडणीचा कट आखण्यात आला.
सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


