अकोला प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तणावपूर्ण वातावरण दिसून येत असताना अकोल्यात मंगळवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील मोहाळा गावात हा हल्ला करण्यात आला. गावातील राजकीय वादातून मतीन पटेल गटाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांना तत्काळ अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
हिदायत पटेल यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप अकोट नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका बोडके यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर हल्ल्याचा संबंध अंतर्गत राजकीय संघर्षाशी जोडला जात असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना घडली होती. त्यानंतर अकोल्यातील हा हल्ला घडल्याने राज्यातील निवडणूक काळातील हिंसाचाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपास सुरू असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.


