चिपळूण प्रतिनिधी
चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात भाषण करत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अचानक चक्कर आल्याची घटना रविवारी घडली. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात राणे यांचा आवाज बसला, त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि भोवळ आल्याने त्यांनी आपले भाषण तात्काळ आटोपते घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळत कार्यक्रमस्थळावरून थेट विश्रामगृहाकडे रवाना होणे पसंत केले.
बहाद्दरशेख नाका येथील स्वा. वि. दा. सावरकर मैदानात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या वतीने ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. ९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. उद्घाटनानंतर सुरू झालेल्या भाषणादरम्यान राणे यांना अचानक प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. आवाज बसल्याने आणि चक्कर आल्याने त्यांनी उपस्थितांची माफी मागत भाषण थांबवले.
कार्यक्रमापूर्वी राणे दाम्पत्याने महोत्सवस्थळी नंदीचे दर्शन घेतले होते. यावेळी पारंपरिक गीतांचे सादरीकरण करण्यात आले. नंदीच्या दर्शनानंतर राणे यांनी दक्षिणाही अर्पण केली. उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला असला तरी भाषणादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे उपस्थितांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्राथमिक स्वरूपात कोणतीही गंभीर अडचण नसल्याचे सांगण्यात येत असून राणे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारीच सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत सूचक वक्तव्य केले. “राजकारणात मला मिळालेली सर्व पदे स्वकर्तृत्वावर मिळाली. माझे ठरलेले ध्येय होते आणि त्या दिशेनेच मी वाटचाल केली. लोकसभेवर जाण्यापूर्वीही मला तिकीट नको, असे मी स्पष्ट सांगितले होते. तरीही पक्षाने संधी दिली. मात्र आता कुठेतरी थांबायला हवे, असे वाटते,” असे सांगत राणे यांनी अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत दिले.
याचवेळी त्यांनी निलेश राणे आणि नितीश राणे यांच्यात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या वादावरही भाष्य करत, हा कौटुंबिक विषय असून त्यावर योग्य वेळी मार्ग काढला जाईल, असे स्पष्ट केले. चिपळूणमधील घटनेनंतर राणे यांच्या प्रकृतीविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून त्यांच्या पुढील कार्यक्रमांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


