मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी जाहीर केले असले, तरी राजीनाम्यानंतर लगेचच भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री आशिष शेलार यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली आहे. या भेटीत पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राऊळ यांच्या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात आहे. यापूर्वीच मुंबईतील साठहून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा) सोडून शिंदे गट वा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा पार्श्वभूमीवर थेट माजी महापौरांनी पक्ष सोडल्याने राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राऊळ यांनी राजीनामा देण्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधला होता. रविवारी त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत प्रवेशासंदर्भातील अंतिम चर्चा झाल्याची चर्चा आहे. राऊळ दहिसर परिसराचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या संभाव्य प्रवेशामुळे दहिसर, बोरिवली व मीरा रोड परिसरात भाजपला राजकीय बळकटी मिळेल, असा दावा भाजपकडून केला जात आहे.
राजीनामा देताना शुभा राऊळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर अढळ विश्वास असल्याचे नमूद करत, शिवसेनेतील प्रदीर्घ सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “काही अपरिहार्य कारणांमुळे शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदाचा तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शुभा राऊळ यांनी तब्बल ३३ महिने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची धुरा सांभाळली. त्या महाराष्ट्र सरकारच्या कोविड-१९ आयुष टास्क फोर्सच्या सदस्य होत्या. १० मार्च २००७ रोजी त्या महापौरपदी निवडून आल्या होत्या आणि मुंबईच्या तिसऱ्या महिला महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. दहिसर परिसरातील त्यांचा जनसंपर्क आणि प्रशासकीय अनुभव लक्षात घेता, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


