मुंबई प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बोलावलेल्या पार्टीचा शेवट थरकाप उडवणाऱ्या घटनेत झाला. सांताक्रूझ परिसरात दोन मुलांच्या आईने आपल्या प्रियकरावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाकोला पोलिसांनी २५ वर्षीय महिलेविरोधात गंभीर दुखापत व गुन्हेगारी धमकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय पीडित आणि आरोपी महिला यांच्यात गेल्या सात वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. पीडित हा महिलेच्या वहिनीचा भाऊ असून दोघेही विवाहित आहेत. महिलेला चार व सात वर्षांची दोन मुले आहेत. आरोपी महिला प्रियकराकडे लग्नाचा आग्रह धरत होती; मात्र पत्नी व मुलांना सोडण्यास त्याने नकार दिल्याने दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
१ जानेवारी रोजी पहाटे साडेएकच्या सुमारास महिलेनं प्रियकराला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी घरी बोलावले. भेटीदरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यानंतर अचानक रागाच्या भरात महिलेने धारदार वस्तूने त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला. घटनेच्या वेळी महिलेची दोन्ही मुले दुसऱ्या खोलीत झोपलेली होती, असे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे.
मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेल्या अवस्थेत पीडिताने कसाबसा पळ काढत कुटुंबीयांना माहिती दिली. त्याला तत्काळ सांताक्रुज पूर्व येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.


