मुंबई प्रतिनिधी
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व तालुक्यात गेली अनेक वर्षे सामाजिक आणि संघटनात्मक कार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड यांनी शुक्रवारी (२ जानेवारी) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. नितीन गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेसमधील विविध पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत भगवा हाती घेतला.
मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक ९३ मधील महायुतीचे उमेदवार सुमित वजाळे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नितीन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेशात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे मुंबई सचिव अजय जाधव, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष फकिरा उकांडे, तालुकाध्यक्ष विजय हिवाळे, स्वामी बनकर, दिलीप कांबळे यांचा समावेश होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे युवक तालुकाध्यक्ष शिवम मेस्त्री, युवक वॉर्ड अध्यक्ष विकेश पवार, अक्षय कामतेकर, मयूर पवार, रितेश मोहिते, सुभाष चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना-भाजप-रिपब्लिकन सेना महायुतीचे उमेदवार सुमित वजाळे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वांद्रे पूर्व भागात नितीन गायकवाड यांचा सामाजिक आणि संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला स्थानिक पातळीवर बळकटी मिळणार असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महायुतीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.


