उमेश गायगवळे. मुंबई
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडते आहे, ते केवळ राजकीय उलथापालथ नाही; ती एका निष्ठावंत लोकशाही व्यवस्थेची हळूहळू होत असलेली मोडतोड आहे. पक्षांतर, फोडाफोडी, खिंडार, गळाला लागणे, घराघरांत फाटलेली राजकीय नाती, हे शब्द आज केवळ बातम्यांत नाहीत, तर सामान्य मतदाराच्या रोजच्या चर्चेचा भाग झाले आहेत.
आज परिस्थिती अशी आहे की आपला नेता नेमका कोणत्या पक्षात आहे, हेच मतदाराला माहीत नाही. कार्यकर्ते संभ्रमात आहेत, निष्ठावंतांची घुसमट होते आहे, आणि या सगळ्यात राजकारण इतके जिवघेणे झाले आहे की रायगडमधील खोपोलीसारख्या ठिकाणी माजी नगरसेवकाची हत्या होते. समाजकारण आणि राजकारण एकमेकांवर आदळून रक्तबंबाळ होण्याची ही लक्षणे अत्यंत धोकादायक आहेत.
राजकारण कशासाठी? सेवा की सत्ता?
राजकारणाचा मूळ हेतू काय होता, आणि तो आज कुठे येऊन ठेपला आहे, हा प्रश्न आता उघडपणे विचारण्याची वेळ आली आहे. राजकारण म्हणजे लोकसेवा, समाजपरिवर्तन आणि विचारधारेचा प्रसार, ही संकल्पना आज इतिहासजमा होत चालली आहे. सत्तेसाठी राजकारण, आणि सत्तेतून पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती आणि प्रसिद्धी, हेच आजचे सूत्र झाले आहे. पैसा सत्तेकडे नेतो आणि सत्ता पुन्हा पैसा निर्माण करते; हे दुष्टचक्र महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने फिरताना दिसते आहे.
आज कोण सत्तेत आणि कोण विरोधात, हे ओळखणेही अवघड झाले आहे. कारण बहुतेक सगळेच जण सत्तेच्या भोवतीच घुटमळताना दिसतात. काल ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्याच मांडीवर बसून आज सत्ता उपभोगली जाते. सेवा नव्हे, तर मेवा हेच राजकारणाचे नवे तत्त्वज्ञान बनले आहे.
विचारधारेपासून सत्ताधारेकडे
काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रहितासाठी उभा राहिला. इंग्रजांविरोधात लढताना त्याने देशाला दिशा दिली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकारणात अनेक पक्ष उदयास आले, कम्युनिस्ट, जनसंघ, जनता पक्ष आणि पुढे भारतीय जनता पार्टी. या पक्षांनी आपापल्या विचारधारा मांडल्या, आणि जनतेने त्या स्वीकारल्या.
मात्र काळ जसजसा पुढे गेला, तसतसा सत्ता हाच एकमेव राजकीय अजेंडा बनत गेला. आधी धर्माच्या नावावर राजकारण झाले, मग जात आली, आणि पुढे प्रादेशिक अस्मिता. धर्म आणि जात यांच्या नावावर ध्रुवीकरण करून सत्ता मिळवण्याचे प्रयोग झाले. या प्रक्रियेत अनेक नेत्यांनी तत्त्वनिष्ठेला हरताळ फासून सत्तानिष्ठेचा स्वीकार केला.
निष्ठेची परंपरा आणि आजची अधोगती
पूर्वी राजकारणात निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोल होते. आजही काही पक्षांत असे कार्यकर्ते आहेत. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे उदाहरण आजही मार्गदर्शक ठरते. अनेक वर्षे विरोधात राहूनही त्यांनी सत्तेसाठी पक्ष बदलला नाही. त्या काळात तात्त्विक मतभेद होते, पण वैयक्तिक द्वेष नव्हता. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जनसंघाचे खासदार असलेल्या वाजपेयींना संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
मात्र 1990 नंतर राजकारणाचा चेहरा बदलला. विरोधकांना शह देण्यासाठी वैयक्तिक पातळीवर हल्ले सुरू झाले. सूडबुद्धी, बदल्याची भावना आणि सत्तेची हाव वाढत गेली. तरीही काही नेत्यांनी संघर्ष सहन करून पक्ष बदलला नाही; हीच खरी तत्त्वनिष्ठा.
पक्षांतर : संधीसाधूपणाचा कळस
आज पक्षांतर हा राजकारणातील कळीचा मुद्दा बनला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश करणारे संधीसाधू नेते आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते, हा संघर्ष प्रत्येक पक्षात दिसतो. ग्रामीण भागात अशा संधीसाधू पुढाऱ्यांना थेट शब्दांत ‘विष्ठावंत’ म्हटले जाते, आणि जनतेचा हा रोष नैतिकदृष्ट्या योग्यच आहे.
ज्या पक्षाने सत्ता, सन्मान, पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी दिली, त्या पक्षाशी निष्ठा न ठेवणारा नेता दुसऱ्या पक्षाशी कसा निष्ठावंत राहील? हा प्रश्न आज सामान्य जनतेच्या मनात आहे. आणि ज्या पक्षात तो प्रवेश करतो, त्या पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी अशा नेत्याला आपला नेता का मानावे, हाही गंभीर प्रश्न आहे.
अनेक वर्षे मेहनत करून जेव्हा सत्तेची फळे मिळण्याची वेळ येते, त्याच वेळी बाहेरून आलेले नेते तिकिटे पळवतात. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता वरिष्ठ नेत्यांच्या बळावर पक्षात शिरून बोकांडी बसतात. अशा वेळी निष्ठावंतांचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे.
घराणेशाही आणि बेगडी निष्ठा
एकाच घरातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांत, एकाच वेळी सत्ता आणि विरोधात हात, ही बेगडी निष्ठा आज सर्वत्र दिसते. सत्तेचा मलिदा खाण्यासाठी तात्त्विक विरोध बाजूला ठेवला जातो. हे जनतेला मूर्ख बनवण्याचे प्रकार आहेत.
राजकारण आज विचारधारेचा प्रवास न राहता थेट व्यवसाय बनला आहे. घराणेशाहीतून पुढच्या पिढ्यांचे करिअर ‘सेटल’ करण्याचे साधन झाले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वाट्याला मात्र सतरंज्या उचलण्याचेच काम उरले आहे. जिकडे सत्ता, तिकडे गर्दी,फुकट फळांसाठी जमलेली माकडे, अशी राजकीय नेत्यांची अवस्था झाली आहे.
जनतेचा अंतिम निर्णय
सत्तेसाठी पक्ष बदलणारे संधीसाधू नेते जर पक्षांत शिरतच राहिले, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वास तुटणारच. अशा लोकांना प्रवेश देऊन पक्षाची दशा आणि दिशा दोन्ही बदलतात, याचा विचार वरिष्ठांनी गांभीर्याने करायला हवा.
सामान्य मतदार अशा संधीसाधू नेत्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना किती काळ मतदान करत राहणार? सत्तेचा मोह हाच जर अंतिम हेतू असेल, तर जनतेने त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात?
विचारधारेसाठी लाठ्या-काठ्या खालेल्या, केसेस अंगावर घेतलेल्या निष्ठावंतांवर हा घोर अन्याय आहे. आणि म्हणूनच, सत्तेसाठी दलबदल करणाऱ्यांना एक दिवस जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही,
हे निश्चित.
कारण शेवटी सत्ता तात्पुरती असते, पण जनतेचा न्याय कायमचा असतो…


