मुंबई प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरू केली असून, पायधुनी पोलिसांनी मशीद बंदर आणि ओशिवरा परिसरात केलेल्या सलग कारवायांमध्ये तब्बल ३६ कोटी ५५ लाख रुपये किमतीचे हेरॉइन जप्त केले आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा पुरुष आणि तीन महिलांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत किरकोळ विक्रेत्यांपासून ते पुरवठा साखळीतील मुख्य सूत्रधारापर्यंतचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस उपायुक्त विजयकांत सागर आणि पायधुनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
१६ डिसेंबर रोजी निरीक्षक सलीम खान, उपनिरीक्षक सचिन लहामगे आणि अनिल वायाळ यांच्या पथकाने मशीद बंदर येथील पी. डिमेलो रोड परिसरात सापळा रचत जलाराम नटवर ठक्कर आणि वसीम मजरुद्दीन सय्यद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत सुमारे सव्वा कोटी रुपये किमतीचे हेरॉइन सापडले. विक्रीसाठी आलेल्या या दोघांकडून अमली पदार्थाचा स्रोत शोधण्यास पोलिसांनी सुरुवात केली.
चौकशीदरम्यान रूबीना खान हिचे नाव पुढे आले. तिने हे हेरॉइन शबनम शेख या महिलेने दिल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर गायब झालेल्या शबनमचा पोलिसांनी राजस्थानमधून शोध घेत तिला अटक केली.
अटक केलेले हे सर्व आरोपी विक्रीच्या टप्प्यावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पुरवठादाराचा शोध अधिक तीव्र केला. पुढील तपासात मुस्कान शेख या महिलेचे नाव समोर आले. तिला मशीद बंदर परिसरातून अटक करण्यात आली. तिच्या चौकशीत या अमली पदार्थ साखळीचा मुख्य सूत्रधार मेहरबान अली असल्याचे उघड झाले. त्याने अब्दुल शेख याच्या माध्यमातून हेरॉइन पाठवल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मेहरबान अलीला अटक केली. त्याच्याकडून १ कोटी ३८ लाख रुपये किमतीचे हेरॉइन जप्त करण्यात आले.
ओशिवऱ्यात पुड्या बांधताना रंगेहाथ पकड
अब्दुल शेखकडून मिळालेल्या माहितीनुसार मेहरबान अली ओशिवरा येथील आनंदनगर भागातून अमली पदार्थांचा साठा आणि वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला असता नवाजीस गालीब खान, सारिक सलमानी आणि समद गालीब खान हे तिघे हेरॉइनच्या पुड्या बांधताना रंगेहाथ सापडले.
या घरातून पोलिसांनी ३३ कोटींपेक्षा अधिक किमतीचे हेरॉइन हस्तगत केले. संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी ३६ कोटी ५५ लाखांचे हेरॉइन, आठ लाख रुपये रोख, एक कार आणि १२ मोबाईल फोन जप्त केले आहेत.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिस अधिक सतर्क झाले असून, या प्रकरणात आणखी आरोपी अटकेत येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


