मुंबई प्रतिनिधी
शासकीय सेवांमधील संधी अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गट-‘ब’ (अराजपत्रित) संयुक्त पूर्वपरीक्षा आणि गट-‘क’ संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी पूर्वी निश्चित केलेली कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या पात्र उमेदवारांना एक वर्षाची विशेष शिथिलता देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे मोठ्या संख्येने उमेदवारांना दिलासा मिळणार असून, अर्ज करण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत मुदत उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
अर्ज कालावधी आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत कायम
एमपीएससीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना २६ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार असून, ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठीही ६ जानेवारी हीच अंतिम तारीख राहील.
ही शिथिलता ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून लागू करण्यात आली असून, पूर्वीच्या निकषांनुसार वयोमर्यादा पूर्ण झाल्याने पात्रतेतून बाहेर पडलेल्या उमेदवारांना या निर्णयाने पुनश्च संधी मिळाली आहे.
आरक्षण व सुधारित मागणीपत्रांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
राज्यात मागास वर्गांसाठी शासकीय सेवांतील नियुक्त्यांमध्ये आरक्षणाची तरतूद लागू आहे. त्यानुसार शासनाच्या सुधारित मागणीपत्रांमध्ये पदसंख्येच्या अनुषंगाने आरक्षण संरचना नमूद करण्यात आली होती. या सुधारीत मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून नवी जाहिरात प्रसिद्ध झाली असली, तरी वयोमर्यादेमुळे काही उमेदवार वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
त्या पार्श्वभूमीवर आयोगाने कमाल संवर्गातील वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देत उमेदवारांना संधी उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा उपकेंद्रे मर्यादित
या दोन्ही परीक्षांसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी काही निवडक केंद्रांचीच व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांतील उपकेंद्रांवरच परीक्षा देता येईल, असे आयोगाने नमूद केले आहे.
उमेदवारांमध्ये समाधानाची भावना
एमपीएससीच्या निर्णयामुळे वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक उमेदवारांना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः मागील काही वर्षांत स्पर्धा तयारीसाठी घेतलेल्या प्रयत्नांना संधी मिळाल्याने हा निर्णय सकारात्मक व न्याय्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


