मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, तिसऱ्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
यामध्ये कुख्यात गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली माजी नगरसेविका गीता गवळी आणि धाकटी मुलगी योगिता गवळी यांनी अखिल भारतीय सेनेकडून भायखळा विभागातील प्रभागांतून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चहलपहल निर्माण झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रांचे वितरण सुरू झाले. शुक्रवारी २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतून एकूण २ हजार ०४० अर्जांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी सात अर्ज दाखल झाले. गेल्या तीन दिवसांत मिळून ९ हजार ०४९ अर्जांचे वितरण झाले असून आतापर्यंत नऊ अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले. अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
अखिल भारतीय सेनेकडून गीता गवळी यांनी प्रभाग क्रमांक २१२ मधून तर योगिता गवळी यांनी प्रभाग क्रमांक २०७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. २०१७ च्या निवडणुकीत गीता गवळी या प्रभाग २१२ मधून निवडून आल्या होत्या. योगिता गवळी या प्रथमच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी अर्ज दाखल केलेल्या प्रभाग २०७ मधून २०१२ मध्ये त्यांची काकी वंदना गवळी निवडून आल्या होत्या; मात्र २०१७ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वी वंदना गवळी यांनी शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला आहे.
नामनिर्देशन प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर रोजी ४ हजार १६५ अर्जांचे, तर दुसऱ्या दिवशी २ हजार ८४४ अर्जांचे वितरण झाले होते. त्यावेळी दोन अर्ज दाखल झाले होते. तिसऱ्या दिवशी सात अर्ज दाखल झाल्याने उमेदवारी रिंगण हळूहळू गती घेत असल्याचे चित्र समोर येत आहे.


