खोपोली प्रतिनिधी
खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पती मंगेश काळोखे यांची रविवारी सकाळी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. शाळेत मुलांना सोडून घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात त्यांना अडवून हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निकालानंतर खोपोलीत २१ डिसेंबर रोजी नवे सरकार स्थापन झाले. अवघ्या चार दिवसांतच शहरावर दु:खाचे सावट पसरले. सकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनुसार, काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या काही व्यक्तींमध्ये व काळोखे यांच्यात वाद झाला, त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
जखमी अवस्थेत काळोखे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरील तसेच शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून हत्येचे कारण व आरोपींचा शोध घेण्यासाठी खोपोली पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


