मुंबई प्रतिनिधी
काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सादर केला. राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
भाजपमध्ये प्रवेश करताच सातव यांनी काँग्रेस सोडण्यामागील कारणे स्पष्ट केली. राजीव सातव यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करणे, महाराष्ट्राच्या सुरू असलेल्या विकास प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हातभार लावणे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह, ही तीन प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रज्ञा सातव या २०२४ मध्ये काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत असतानाही त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने विधान परिषदेमधील काँग्रेसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावरील काँग्रेसचा दावा कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सातव यांच्यासोबत काँग्रेसचे काही तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील काळात आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी नमूद केले. वरिष्ठांनी दिलेल्या तारखेला भव्य कार्यक्रमात हा पक्षप्रवेश घडवून आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.


