मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा खात्याचा कारभार काढून घेण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर कोकाटे सध्या बिनखात्याचे मंत्री ठरले असून ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे…!
वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’…— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या थेट विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. “आम्ही आणखी एका मंत्र्याची विकेट पडण्याची वाट पाहत आहोत,” असे सूचक विधान करत त्यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे नाव घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत टीकात्मक भूमिका घेतली. कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता, असे नमूद करत सरकारनेही वेळीच निर्णय घेऊन ‘कायदा सर्वांसाठी समान’ हा संदेश द्यायला हवा होता, असे त्यांनी म्हटले. उशिराने घेतलेला निर्णय म्हणजे नाईलाजाने उचललेले पाऊल असल्याचा टोला त्यांनी लगावला.
पुढे बोलताना पवार यांनी, या प्रकरणातून अनेकांनी धडा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, “आम्ही मंत्री संजय शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहत आहोत,” असे स्पष्टपणे सांगत त्यांनी संभाव्य राजकीय घडामोडींचे संकेत दिले.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्यावर १९९५ मधील प्रकरणात खोटी कागदपत्रे सादर करून नाशिकमधील मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील सदनिका लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या प्रकरणात लोकप्रतिनिधीपद रद्द होते. याच तरतुदीनुसार त्यांच्या खात्याचा कारभार काढून घेण्यात आला आहे.
या घडामोडींमुळे राज्य मंत्रिमंडळात पुढे काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


