इंदौर :
भाजप आमदार राकेश ऊर्फ गोलू शुक्ला यांच्या मुलाचा विवाहसोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भव्य सेट, नेत्रदीपक सजावट आणि लाखोंच्या आतषबाजीमुळे हा लग्नसोहळा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या विवाहासाठी इंदौरमध्ये खास चित्रपटसदृश सेट उभारण्यात आला होता. रंगीबेरंगी प्रकाशयोजना, आकर्षक डेकोरेशन आणि भव्य व्यवस्था यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. विशेष म्हणजे, या लग्नसोहळ्यात केवळ फटाक्यांसाठी सुमारे ७० लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या आतषबाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या सोहळ्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसमधील काही नेत्यांनीही हजेरी लावल्याचे दिसून आले. लग्न ज्या ठिकाणी पार पडलं, तेथे खास सजावट करण्यात आली होती. हा शाही सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली होती. अनेक जण केवळ सजावट आणि आतषबाजी पाहण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.
दरम्यान, या लग्नातील आतषबाजी, सेट आणि एकूणच थाटामाटाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. काहींनी या विवाहाची तुलना मोठ्या सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यांशी केली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या खर्चावरून टीकेची झोडही उठली आहे. ‘पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे’, ‘आपल्या करातूनच हा खर्च होत नाही ना?’ अशा प्रतिक्रिया काही युजर्सकडून व्यक्त केल्या जात आहेत.
एकीकडे शाही विवाहसोहळ्याची चर्चा रंगत असताना, दुसरीकडे त्यातून निर्माण झालेला वाद आणि प्रश्नचिन्हेही तितक्याच वेगाने पुढे येत आहेत.


