रायगड प्रतिनिधी
महाड नगरपरिषद निवडणुकीत मंगळवारी मतदानादरम्यान तणावाने उच्चांक गाठला. गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक, मारहाण आणि वाहनांची तोडफोड केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या वादादरम्यान रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा थरारक आरोप समोर आल्यानंतर महाडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नवे नगर परिसरात मतमोजणीदरम्यान ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड झाल्यानंतर दोन्ही गटांचे समर्थक मतदान केंद्राबाहेर एकत्र जमले. यावेळी किरकोळ बाचाबाची पाहता पाहता हाणामारीत परिवर्तित झाली. सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच, जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांची काचफोड झाल्याचीही माहिती मिळाली.
वाद तीव्र होत असताना जाबरे गटातील कार्यकर्त्यांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर विकास गोगावले स्वतः रिव्हॉल्व्हर हातात घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर गोगावले–जाबरे मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून त्याचा परिणाम थेट मतदान प्रक्रियेत दिसून आला.
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष उघडपणे सर्वांसमोर येत आहे. या वैराची ठिणगी महाडच्या रस्त्यांवर पेट घेताना दिसली. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, “मतदानात शांतता राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. परंतु काही युवा नेते मतदान केंद्रात प्रवेश करून आरओशी हुज्जत घालतात. अधिकृत उमेदवार आणि प्रतिनिधीखेरीज मतदान केंद्रात प्रवेशाची मुभा नसताना विकास गोगावले आत जात असल्याचे आम्हाला दिसले,” अशी टीका त्यांनी केली.
महाडमध्ये दिवसाखेरीस परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस दलाला मोठी कसरत करावी लागली. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या राड्याचा परिणाम स्थानिक राजकारणावर काय होणार, याची उत्सुकता वाढली आहे.


