मुंबई प्रतिनिधी
राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीतील अध्यक्षपदांसह तब्बल ६,०४२ सदस्यपदांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. आठ वर्षांनंतर होत असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यभर राजकीय तापमान चढले आहे. हजारो उमेदवारांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार असून उद्या, ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था उभी करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणा अलर्टवर असून संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पथके तैनात आहेत.
यावेळी महायुती किंवा महाविकास आघाडीच्या एकत्रित लढतीपेक्षा स्थानिक पातळीवरील समीकरणांना प्राधान्य देत अनेक ठिकाणी स्वतंत्र रणनीती आखण्यात आली. दरम्यान, बारामती, आंबरनाथ, अणेगावसह २४ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
प्रचाराचा धडाका सोमवारी संध्याकाळी संपला. अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी राज्यभर सभा घेऊन वातावरण रंगवले. अनेक मंत्र्यांनी आणि प्रमुख नेत्यांनीही प्रचारदौरे करत शक्तिप्रदर्शनाची संधी साधली.
आता सर्वांचे लक्ष मतदारांवर आणि उद्याच्या निकालावर…


