हिंगोली प्रतिनिधी
राज्यात निवडणुकीचा तापलेला माहोल आणि प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच हिंगोलीत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील मंगळवारा परिसरातील शेतकरी भवनजवळ ही रोकड एका चारचाकी वाहनातून सापडली.
निवडणूक आयोग आणि पोलिस यंत्रणा पैशांच्या अवैध देवाणघेवाणीवर कडक नजर ठेवून असताना दरवाजा उघडताच मोठ्या रकमेची बॅग दिसल्याने पथकही चक्रावून गेलं. रोकड कोणाची आणि कुठे नेली जात होती, याबाबत कोणताही स्पष्ट तपशील अद्याप समोर आलेला नाही.
रक्कम आढळताच पोलिसांनी तात्काळ निवडणूक विभागाला कळवले. त्यानंतर भरारी पथकाने रोकड ताब्यात घेत सविस्तर पडताळणी सुरू केली आहे. पैशांशी संबंधित कागदपत्रांची छाननी, वाहनातील व्यक्तींची चौकशी आणि रकमेचा संभाव्य संबंध यावर तपासाचे चक्र वेगाने फिरत आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला एवढी मोठी रोकड सापडल्याने शहरात चर्चांना ऊत आला आहे. प्रशासनाची हलचल वाढली असून निवडणुकीच्या पारदर्शकतेवर कोणतीही शंका राहू नये यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.


