मुंबई प्रतिनिधी
गेल्या महिनाभरापासून प्रकृती बिघडल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिलेल्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी आज माध्यमांसमोर हजेरी लावली. उपचार सुरू असले तरी तब्येत सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजकीय घडामोडींवरही त्यांनी नेहमीच्या धडाडीने टीकास्त्र सोडले.
“रेडिएशनचा टप्पा संपला आहे. इतर उपचार सुरू आहेत. डिसेंबरनंतर पूर्ण बरा होईन, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. महिनाभर घर–हॉस्पिटलच्या कैदेत आहे. उद्धव ठाकरे माझ्यावर बारीक लक्ष ठेवत आहेत,” अशी माहिती राऊतांनी दिली.
“माझ्यासारखा माणूस शांत बसू शकत नाही. तब्येत ठीक असती तर नगरपालिकांच्या प्रचारासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो असतो,” असंही त्यांनी हसत म्हणाले.
शिंदे गटावर करारी टिका : “गुलाबो गँगचे लक्ष्मीदर्शन निवडणूक आयोगानं तपासावं”
नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांपूर्वी पैशाच्या जोरावर मतप्रलोभने देत असल्याचा आरोप करताना राऊत म्हणाले,
“शिंदे गटाच्या ‘गुलाबो गँग’ने आज लक्ष्मीदर्शन होणार असल्याचं सांगितलं. मतामागे 10–15 हजार रुपयांचे व्यवहार होत आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एवढा पैसा कधीच फिरला नव्हता.”
पूर्वी स्थानिक कार्यकर्ते लढवत असलेल्या या निवडणुकांत आता 5–6 हेलिकॉप्टर, खाजगी विमाने झटत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
“महाराष्ट्राच्या राजकारणात पैशाचा असा खेळ कधीच झाला नव्हता,” अशी टीका राऊतांनी केली.
“शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच काढणार”
शिंदे–भाजप संबंधांवर भाष्य करताना राऊतांची तोफ अधिकच धडाडली.
“शिंदे यांची शिवसेना म्हणायला तयार नाही. त्यांचा गट अमित शहांनीच उभा केला आहे. आणि त्यांचाच कोथळाही अमित शहा काढणार, हे लिहून ठेवा.
शिंदेंचे ३५ आमदार फुटणार, अशी ही मंडळी आतूनच सांगत आहेत,” असा दावा त्यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची झालेली नियुक्तीही त्याच राजकीय गणिताचाच भाग असल्याचे राऊतांनी सुचवले.
“दिल्लीतील दोन नेते कोणाचेच नाहीत. हे सगळे पैशाच्या जोरावर निवडणुका लढतात. ही लोकशाही नाही,” असा घणाघात राऊतांनी केला.


