मुंबई प्रतिनिधी
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावर स्पष्टपणे जाणवत असून, १ डिसेंबर रोजी अनेक भागांत ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. किमान तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होणार असली तरी उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील 10 जिल्ह्यांत ‘थंडीची लाट’ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) यलो अलर्ट जारी केला आहे.
कोकण : कोरडे व थंड हवामानाची शक्यता
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यांत पुढील 24 तासांत कोरडे वातावरण राहील, असा अंदाज IMDने दिला आहे.
मध्य महाराष्ट्र : 7 जिल्ह्यांत गारठा वाढणार
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांत गारठा लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर येथे हवामान कोरडे राहील.
मराठवाडा : तीन जिल्ह्यांत यलो अलर्ट
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी येथे थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भ : भंडाऱ्यात 10 अंश; नागपुरात धुक्याची शक्यता
विदर्भात थंडीची तीव्रता वाढली असून ३० नोव्हेंबर रोजी भंडाऱ्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.
नागपूर शहरात १ डिसेंबर रोजी धुक्यासह ढगाळ वातावरण अपेक्षित आहे.
राज्यातील उत्तर व पूर्वेकडील भागांत तापमानात चढ-उतार सुरूच राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


