मुंबई प्रतिनिधी
मुंबई : “पोलिस म्हणजे केवळ कायदा राखणारे नाहीत, तर जीव वाचवणारे खरे देवदूत!” हे वाक्य सत्य ठरेल, अशी घटना रविवार रात्री डोंगरी परिसरात घडली. प्रसूतीवेदनांमध्ये विव्हळणाऱ्या महिलेची फुटपाथवरच यशस्वी प्रसूती करून डोंगरी पोलीस ठाण्यातील महिला अंमलदारांनी धाडस आणि मानवी संवेदनांचा उत्तम नमुना दाखवला. प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
घटनाक्रम
उमरखाडी, सामंतभाई नानजी मार्ग येथून रात्री उशिरा एका महिलेला रस्त्यावर प्रसूती होण्याची स्थिती निर्माण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ डोंगरी पोलिसांची ५ नंबर मोबाईल व्हॅन घटनास्थळी पोहचली. तेथे मालादेवी महेश्वरन नाडर (३६) ही महिला वेदनांनी तडफडताना दिसली. तिचा पती महेश्वरन नाडरही असहाय स्थितीत तेथे उपस्थित होता.
परिस्थिती अत्यंत गंभीर होती. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असल्याचे लक्षात येताच अधिक मदतीसाठी आणखी एक मोबाईल व्हॅन बोलावण्यात आली. महिला पोलिसांनी प्रथम धीर देत कपड्यांच्या सहाय्याने आडोसा केला. जमलेल्या गर्दीपासून महिलेचे रक्षण करत त्यांनी तत्काळ प्रसूतीची तयारी सुरू केली.
पोलीस आणि नागरिकांचे एकत्र धाडस
दरम्यान, गस्तीवर असलेले बीट मार्शल पो. शि. खडसे हे चादरी आणि दोन स्थानिक महिलांना घेऊन ताबडतोब मदतीला पोहोचले. महिला पोलीस अंमलदारांनी या महिलांच्या मदतीने प्रसूती प्रक्रिया सुरू केली.
थोड्याच वेळात रस्त्याच्या कडेला, अवघड परिस्थितीत नवजात बाळाचा जन्म झाला. बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकताच तणावाचे वातावरण आनंदात बदलले. प्रसूतीनंतर आई आणि बाळाला स्वच्छ करून काळजीपूर्वक कपड्यात गुंडाळण्यात आले.
रुग्णालयात सुरक्षित दाखल
प्रसूतीनंतर त्वरित डोंगरी १ नंबर मोबाईल व्हॅनमधून महिला आणि बाळाला सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी नाळ व्यवस्थित कापून दोघांची तपासणी केली आणि ते पूर्णपणे सुखरूप असल्याचे सांगितले.
कर्तव्यदक्ष पोलिसांचे विशेष कौतुक
या महत्त्वाच्या कार्यात डोंगरी पोलिसांचे निरीक्षक रासम, निरीक्षक साबणे, एएसआय गायकवाड, हेड कन्स्टेबल फड, पो. शि. जाधव, सावंत, टेकाळे आणि पो. शि. खडसे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
धारावी आणि डोंगरी परिसरातील नागरिकांनी या पोलिसांच्या तातडीच्या प्रतिसादाचे आणि मानवतेने केलेल्या सेवाभावाचे मनापासून कौतुक केले.
डोंगरी पोलिसांची मानवी भावना दर्शवते
पोलिस यंत्रणा ही केवळ गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी नसून, समाजातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनरक्षणासाठीही तत्पर असते, हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
ही घटना दाखवते की वर्दीतील हे “खरे हिरो” वेळ आल्यास डॉक्टरही बनतात…
आई आणि बाळाच्या चेहऱ्यावरचे हास्यच त्यांच्या सेवाभावाचे मोठे पारितोषिक!


