मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शिक्षणव्यवस्थेला ५ डिसेंबर रोजी मोठा धक्का बसणार आहे. राज्यभरातील सर्व शाळा त्या दिवशी बंद राहणार असून, राज्यव्यापी शिक्षक संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शिक्षकांनी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्याची घोषणा केली आहे.
शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा. तसेच १५ मार्च २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या संचमान्यता निर्णयाचा पुनर्विचार करून जुने निकष लागू करावेत. शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणीही संघटनांनी पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे केली आहे.
या आंदोलनात राज्यभरातील हजारो शिक्षक सहभागी होणार असल्याने ५ डिसेंबरला शाळा कार्यरत राहणार नाहीत. शिक्षक अनुपस्थित राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनी त्या दिवशी मुलांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
टीईटी अनिवार्यतेच्या निर्णयाला शिक्षक संघटनांनी अन्यायकारक ठरवत तीव्र विरोध दर्शवला आहे. अनुभवी शिक्षकांना नव्याने पात्रता परीक्षा देणे भाग पाडणे म्हणजे त्यांच्या सेवेला कमी लेखणे असल्याचे संघटनांचे मत आहे.
सरकारने मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.


