स्वप्नील गाडे|रिपोर्टर
मुंबई : घाटकोपर (प.) येथील असल्फा परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला सावत्र सुनेनेच निर्घृणपणे ठार मारल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे. सहनाज अनिस काजी (६३) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रॉपर्टीतील हिस्सा आणि अंगावरील दागिन्यांवर डोळा ठेवून संशयित मुमताज इरफान खान बुधवारी रात्री सहनाज यांच्या घरी गेली. त्यांच्यावर हल्ला करत खून करून दागिने घेऊन ती पसार झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर परिमंडळ ७ चे उपायुक्त राकेश ओला, सहायक पोलिस आयुक्त शैलेश पासळवार आणि वरिष्ठ निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे केवळ २४ तासांत मुमताजला कुर्ल्यातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणाचा पुढील तपास घाटकोपर पोलिस करत आहेत.


