मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्व परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास गतीमान करण्याच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी नुकतेच विविध कामांचे भूमिपूजन केले.
“वांद्र्यातील १९ रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेकडून तब्बल ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेता आल्याचा आनंद आहे,” अशी भावना व्यक्त केली.
स्थानिक स्तरावर रस्ते, गटार-नाले, जलवाहिन्या आणि झोपडपट्टी पुनर्विकासाशी संबंधित कामांना प्राधान्य देत असल्याचे सांगत सरदेसाई यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणींच्या निराकरणासाठी हे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. परिसरातील नागरिकांनीही “आमदारांनी विकासकामांना दिलेला वेग लक्षणीय असून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली.
सांताक्रुझ टीपीएस, हनुमान सोसायटी रस्ता, आदर्श लेन, दीपकवाडी रस्ता आणि कार्डिनल ग्रेशियस रोडलगतच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. संबंधित रस्ते एस्फाल्ट मास्टिक तंत्रज्ञानाने बांधण्यात येणार असून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांची देखभाल कंत्राटदारांकडेच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


