पटना:
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड बहुमताने परतवल्यानंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापनेची लगबग सुरू झाली आहे. शपथविधी समारंभाच्या तयारीला वेग आला असून आघाडीतील सर्व पक्षांमध्ये मंत्रीपदांच्या वाटपाबाबत अंतिम चर्चांना जोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून १५ ते १६ मंत्री मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयूचे तब्बल १४ मंत्री शपथ घेऊ शकतात. लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांच्या खात्यात तीन मंत्रीपदे जाण्याची चर्चा असून जितन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, भाजपने मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच अंतर्गत यंत्रणा चुस्त-दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. दिलीप जयस्वाल आणि सम्राट चौधरी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळते.
एनडीए नेतृत्वाकडून सर्व घटक पक्षांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची हमी देण्यात येत आहे. युतीची एकता ठळकपणे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्नही सुरू असून आगामी काळात राज्यसभेतील जागांचे वाटपही एनडीएच्या फायद्याचे ठरू शकते, असे संकेत मिळत आहेत.
शपथविधी सोहळा १९ किंवा २० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटणा प्रशासनाने १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान गांधी मैदान सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा सल्ला जारी केला असून याच मैदानावर शपथविधीची मोठी तयारी सुरू आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून १७ नोव्हेंबरपासून तयारीत आणखी गती येणार आहे.
२०२५ च्या निवडणुकांत एनडीएने तब्बल २०२ जागा मिळवत ऐतिहासिक यशाची नोंद केली. याउलट महाआघाडीचा दारुण पराभव झाला असून त्यांना ३५ जागांचाही टप्पा पार करता आला नाही. प्रशांत किशोर यांच्या जनसूरजला एकही जागा मिळाली नाही, तर एआयएमआयएमने पाच जागांवर विजय मिळवला.
नवीन सरकारच्या शपथविधीची अधिकृत घोषणा आता केवळ औपचारिकता उरली असून पाटण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


