मुंबई प्रतिनिधी
पुण्यातील कोंढवा येथील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारावरून निर्माण झालेल्या राजकीय वादळानंतर अखेर हा व्यवहार रद्द करण्यात आल्याची पुष्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पार्थ पवारांवर गंभीर आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
“माझ्या माहितीनुसार हा व्यवहार रद्द झाला आहे. चौकशी समिती नेमण्यात आली असून, या समितीकडून संपूर्ण तपास केला जाणार आहे. कोणी मदत केली, कुणाचे फोन आले, यासह सर्व बाबींची चौकशी होईल,” असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार पुढे म्हणाले, “मी नेहमीच माझ्या स्वकीयांनाही सांगतो — नियमांच्या बाहेर जाऊन काहीही करणं मला मान्य नाही. माझ्या राजकीय आयुष्यात मी कधीही नियम तोडले नाहीत. पूर्वी माझ्यावर आरोप झाले, पण ते सिद्ध झाले नाहीत. आता पुन्हा अनावश्यक कमेंट्स करून मला आणि माझ्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संवादाचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री नागपूरमध्ये होते. मी स्वतः फोन करून त्यांना सांगितलं. हा व्यवहार माझ्या घरातील व्यक्तींचा असला तरी नियमांनुसार जे योग्य ते करा, चौकशी करा. माझा त्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा राहील.”
अजित पवारांनी स्पष्ट केले की, या व्यवहारात एक रुपयाही दिला गेला नव्हता. “मोठमोठे आकडे सांगण्यात आले, चर्चा रंगली, पण प्रत्यक्ष व्यवहार झालाच नाही. आता तो पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे,” असं ते म्हणाले.
दरम्यान, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समिती पुढील महिन्याभरात आपला अहवाल सादर करणार असून, या तपासानंतर या वादग्रस्त प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होण्याची शक्यता आहे.


