• विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ; शुल्क नियामक प्राधिकरणावर गंभीर आरोप
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील प्रचंड गैरव्यवहाराचा आणखी एक भांडाफोड समोर आला आहे. सुमारे ४,००० व्यावसायिक कोर्सेस चालवणाऱ्या महाविद्यालयांकडून दरवर्षी तब्बल १०,००० कोटी रुपयांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप मुक्त शिक्षक संघटना आणि TAF-NAF संघटनेने केला आहे.
शुल्क नियामक प्राधिकरणाकडून (FRA) बोगस आणि अवाजवी शुल्कवाढ प्रस्तावांना मंजुरी दिली जात आहे, असा थेट आरोप संघटनेने केला आहे. या निर्णयांचा फटका थेट विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बसत असून अनेक जण आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
रत्नदीप कॉलेज प्रकरणाने धक्कादायक चित्र समोर
कर्जत-जामखेड येथील रत्नदीप कॉलेज हे दोन वर्षांपासून बंद असतानाही ९४ विद्यार्थ्यांचे तब्बल ५ कोटी रुपये अद्याप परत करण्यात आलेले नाहीत, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. शिक्षण संस्थेच्या निष्काळजीपणामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले असून, न्यायासाठी ते दरदर फिरत आहेत.
या अन्यायाविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले. “आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे… मुलांचे भविष्य अडकलंय, पण कोणी ऐकून घेणारा नाही,” असा संताप आंदोलनकर्त्या पालकांनी व्यक्त केला.
आंदोलनकर्त्यांची भेट घेत FRA सचिव अर्जुन चिखले यांनी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, शेकडो कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्याबाबत खरंच कठोर कारवाई होणार का, हा प्रश्न राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहे.
दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील या गैरव्यवहाराबाबत राज्य शासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.


