नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय निवडणूक आयोग आज देशभरातील मतदारयाद्यांबाबतचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय जाहीर करणार आहे. सोमवारी दुपारी ४.१५ वाजता आयोगाची पत्रकार परिषद होणार असून, त्यात मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीसंदर्भात (SIR – Special Intensive Revision) महत्त्वाच्या तारखांची घोषणा होईल.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह सिंधू आणि विवेक जोशी या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील दहा ते पंधरा राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदारयादींच्या पुनर्पडताळणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी आयोगाने या राज्यांपासून प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पुनर्पडताळणीत नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांचे नाव वगळणे, दुबार नोंदी रद्द करणे आणि यादीतील तांत्रिक चुका दुरुस्त करण्याचे काम होईल. बिहारमध्ये अलीकडेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती आणि आयोगाने ती यशस्वी ठरल्याचे नमूद केले होते. आता तीच पद्धत इतर राज्यांत राबवली जाणार आहे.
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात SIR
महाराष्ट्रात मात्र ही प्रक्रिया पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीच्या असल्याने, आयोगाला ३० जानेवारीपर्यंत त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मतदारयादी पुनर्पडताळणीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतचोरीच्या आरोपांवरून विरोधकांचा मोर्चा
राज्यात सध्या मतदारयादीतील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे. येत्या १ नोव्हेंबरला मुंबईत विरोधकांकडून मोर्चा काढला जाणार आहे. मतदारयाद्या स्वच्छ न झाल्यास निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


