
न्यूयॉर्क
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकर्या जाण्याची भीती आता वास्तवात उतरताना दिसत आहे. जगातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन लवकरच आपल्या वेअरहाऊसमधील तब्बल पाच लाख कर्मचाऱ्यांची जागा रोबोट्सने घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने कंपनीच्या अंतर्गत कागदपत्रांच्या आधारे ही धक्कादायक माहिती दिली आहे.
या कागदपत्रांनुसार, अॅमेझॉनच्या रोबोटिक्स टीमचे उद्दिष्ट वेअरहाऊस व्यवस्थापनातील सुमारे ७५ टक्के कामकाज ऑटोमेट करणे हे आहे. म्हणजेच, वस्तूंचे पिकिंग, पॅकिंग आणि डिलिव्हरीसाठी लागणाऱ्या माणसांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
रिपोर्टनुसार, ऑटोमेशनमुळे अॅमेझॉन २०२७ पर्यंत सुमारे १.६ लाख नव्या नोकर्या निर्माण होण्याची गरज टाळेल. यामुळे प्रत्येक वस्तूमागे कंपनीला अंदाजे ३० सेंट्स (सुमारे २६ रुपये) इतकी बचत होईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मालाची विक्री दुप्पट झाली तरी २०३३ पर्यंत कंपनीला सुमारे ६ लाख नोकर्या निर्माण करणे टाळता येईल.
सध्या अॅमेझॉनमध्ये १२ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, आगामी काळात मानवी कामकाजाच्या जागी यंत्रांचा प्रभाव वाढणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
कंपनीत होत असलेल्या या मोठ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने आपल्या अंतर्गत भाषेतही बदल केला आहे. ‘ऑटोमेशन’ किंवा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या शब्दांऐवजी कंपनी आता ‘प्रगत तंत्रज्ञान’ हा शब्द वापरत आहे. तसेच ‘रोबोट्स’ ऐवजी ‘कोबॉट्स’ (म्हणजे मानव आणि रोबोट्स यांच्यातील सहयोग) असा शब्दप्रयोग करण्यात येतोय.
कंपनीची प्रतिमा ‘गुड कॉर्पोरेट सिटीझन’ म्हणून उभी करण्यासाठी अॅमेझॉन सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग नोंदवण्याचा विचार करत असल्याचेही न्यूयॉर्क टाइम्सने नमूद केले आहे.
अॅमेझॉनच्या प्रवक्त्या केली नँटेल यांनी सांगितले की, “ही कागदपत्रे कंपनीतील एका गटाचा दृष्टिकोन दाखवतात. अॅमेझॉन आगामी सणासुदीच्या हंगामात २.५ लाख हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे,” असे त्या म्हणाल्या. मात्र, ही भरती कायमस्वरूपी असेल की कराराधारित, याबाबत कंपनीने भूमिका स्पष्ट केलेली नाही.
२०१२ साली अॅमेझॉनने किवा (Kiva) ही रोबोटिक्स कंपनी तब्बल ७७५ दशलक्ष डॉलर्सना खरेदी केली होती. त्यानंतरपासूनच कंपनीने रोबोटिक ऑटोमेशनच्या दिशेने झपाट्याने वाटचाल सुरू केली. गेल्या वर्षी अॅमेझॉनने त्यांचे सर्वात अत्याधुनिक वेअरहाऊस सुरू केले, जिथे सुमारे १००० रोबोट्स पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने पॅकेजिंगची प्रक्रिया हाताळतात.
मानव आणि यंत्र यांच्यातील सीमारेषा दिवसेंदिवस पुसट होत चालली आहे; आणि अॅमेझॉनचे हे पाऊल त्याचेच जिवंत उदाहरण ठरते आहे.