अबूधाबी :
दररोज लाखो भारतीय उपजीविकेसाठी परदेशी जातात. पण एका क्षणात ‘अरबोपती’ होण्याचं स्वप्न फारच थोड्यांच्या नशिबात असतं. अबूधाबीतील २९ वर्षीय भारतीय युवक अनिलकुमार बोला याचं ते स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झालं आहे. यूएई लॉटरीत तब्बल १०० दशलक्ष दिरहम (सुमारे ₹२४० कोटी रुपये) जिंकत तो एकाच झटक्यात चर्चेत आला आहे.
यूएई लॉटरीकडून अधिकृतरीत्या घोषित करण्यात आलेल्या निकालानुसार, अनिलकुमार बोला हा अबूधाबीतील सर्वात मोठ्या जॅकपॉटचा विजेता ठरला आहे. १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘लकी डे ड्रॉ #२५१०१८’ मध्ये त्याचा लॉटरी क्रमांक ८,८३५,३७२ निवडला गेला.
“जेव्हा मला यूएई लॉटरी टीमकडून फोन आला, तेव्हा मी घरीच होतो. सुरुवातीला वाटलं कोणीतरी थट्टा करत आहे. वारंवार विचारून घेतल्यावरच विश्वास बसला. आजही वास्तव समजून घ्यायला वेळ लागत आहे,” असं भावनिकपणे अनिलने सांगितलं.
‘मोठं काहीतरी करायचं आहे’
अनिलकुमार बोला सांगतो, “ही रक्कम मिळाल्यानंतर आता माझ्याकडे स्वप्नं साकार करण्याची ताकद आहे. मला काहीतरी मोठं करायचं आहे, काहीतरी वेगळं उभं करायचं आहे.”
त्याने पुढे सांगितले, “माझं एक स्वप्न आहे, एक सुपरकार खरेदी करण्याचं. मला माझ्या या क्षणाचा आनंद एखाद्या आलिशान रिसॉर्ट किंवा ७-स्टार हॉटेलमध्ये साजरा करायचा आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मला माझ्या आईवडिलांची लहान लहान स्वप्नं पूर्ण करायची आहेत.”
करमुक्त जॅकपॉट
यूएईमध्ये लॉटरी जिंकल्यावर कोणताही उत्पन्नकर लागू होत नाही. त्यामुळे अनिलकुमार बोला याला १०० दशलक्ष दिरहम पूर्णपणे करमुक्त मिळणार आहेत. उलट भारतात अशी लॉटरी लागली असती तर जवळपास ३० टक्के उत्पन्नकर, १५ टक्के अधिभार आणि ४ टक्के उपकर अशा मिळून तब्बल ८६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कररूपाने द्यावी लागली असती.
भाग्यवान आई
अनिलकुमार बोला मूळचा आंध्रप्रदेशचा असून त्याचे आईवडील सध्या तिथेच राहतात. दीड वर्षांपूर्वी तो उदरनिर्वाहासाठी अबूधाबीला गेला होता. “मी नेहमी मजेसाठी लॉटरी तिकिट घेत असे. माझ्या आईचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झाला आहे. तीच माझ्या नशिबाची देवता आहे असं मी मानतो. म्हणूनच मी ११ अंक असलेलं तिकीट घेतलं, आणि तेच भाग्यवान ठरलं,” असं तो हसत सांगतो.
एका सामान्य भारतीय तरुणाने परदेशात मेहनतीने जगताना एका क्षणात ‘अरबोपती’ होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. अबूधाबीतील अनिलकुमार बोला आता यूएई लॉटरीच्या इतिहासात सर्वात मोठ्या जॅकपॉटचा विजेता म्हणून नोंदवला गेला आहे.


