
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे तब्बल 17 वर्षे विशेष कार्याधिकारी म्हणून काम पाहणारे सतीश राऊत पुन्हा आपल्या मूळ विभागात दाखल झाले आहेत. नुकतीच त्यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) या संस्थेवर प्रतिनियुक्तीवर सचिव म्हणून एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. पण या नियुक्तीला अवघा एक महिना पूर्ण होत असतानाच त्यांनी मूळ विभागात परतण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सतीश राऊत हे शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यातील पडद्यामागच्या अनेक घडामोडींचे साक्षीदार राहिले आहेत. त्यांची कामकाजातील अचूकता आणि शिस्त यामुळे पवारांच्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांपैकी त्यांची गणना केली जाते. मात्र त्यांनी अचानक मूळ विभागात परतल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या निर्णयामागे नेमकं काय दडलं आहे, यावर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. स्वतः राऊत यांनी सोशल मीडियावर आपल्या परतीची माहिती दिली आहे.
दरम्यान, राज्य प्रशासनातील इतर हालचालींमध्येही महत्त्वाचे बदल झाले आहेत. राजभवनमध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) या पदावर देशपांडेंना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांनी जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पर्यटन आणि क्रीडा अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीपूर्वी महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना मोठी ‘दिवाळी भेट’ दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येक आमदाराला 2 कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामांना गती देण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आला असून, आमदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या निर्णयामुळे राज्यातील सामाजिक विकास योजनांना गती मिळणार असून, शासकीय स्तरावरच्या बदलांनी राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना चालना दिली आहे.