
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात मोठी कारवाई करत कपड्यांच्या खेपेमध्ये लपवून आणलेले तब्बल ४.८२ कोटी रुपयांचे चिनी फटाके जप्त केले आहेत. या प्रकरणात गुजरातच्या वलसाड येथील एका प्रमुख तस्कराला अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी बंदरात ४० फूट लांबीचा कंटेनर तपासणीसाठी थांबवला असता, तो चीनमधून आलेला असल्याचे आणि त्यातील माल ‘लेगिंग्ज’ म्हणून घोषित करण्यात आल्याचे समोर आले. मात्र, तपासणीत कपड्यांच्या थराखाली लपवलेले तब्बल ४६ हजार ६४० चिनी फटाके आढळले.
या तस्करी प्रकरणातील जप्त मालाची एकूण किंमत ४.८२ कोटी रुपये असून, तपासादरम्यान मिळालेल्या कागदपत्रांमधून तस्करी सिंडिकेटच्या कार्यपद्धतीचा तपशील उघड झाला आहे. त्यावरून प्रमुख आरोपीला वलसाड येथे अटक करण्यात आली.
फटाक्यांची आयात ही परराष्ट्र व्यापार धोरणातील आयटीसी (एचएस) वर्गीकरणानुसार प्रतिबंधित असून, अशा वस्तू आयात करण्यासाठी परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) आणि पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संघटना (पीईएसओ) यांच्याकडून वैध परवाना आवश्यक असतो, असे डीआरआयने स्पष्ट केले आहे.
या कारवाईमुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशात चिनी फटाक्यांची अवैध घुसखोरी रोखण्यात मोठे यश मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.