कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या काळात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांत चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. म्हालसवडे (ता. करवीर) येथे पती-पत्नीचा, कळंबा तलावात एका १३ वर्षीय मुलाचा, तर वारणानगर परिसरात ड्रेनेजमध्ये पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या सलग घटनांनी जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.
शेतातील विहिरीत पती-पत्नीचा मृत्यू
करवीर तालुक्यातील म्हालसवडे गावात रंगराव रामचंद्र कांबळे (वय ५३) आणि मनीषा रंगराव कांबळे (वय ४५) या पती-पत्नींचा त्यांच्या शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाला.
घटनेची वेळ सायंकाळी पाच वाजताची असून, मनीषा कांबळे जनावरांसाठी पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी गेलेले रंगराव कांबळेही विहिरीत बुडाले. काही वेळानंतर विहिरीवर तरंगणारे पाण्याचे भांडे आणि चप्पल दिसल्याने शेतकऱ्यांना शंका आली. ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांना कळवले. दोघांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे दोन मुलगे, सून आणि नात असा परिवार आहे.
कळंबा तलावात १३ वर्षीय मुलाचा बळी
कळंबा येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या संग्राम कुमार काळे (वय १३, मूळ गाव कलागदी, जि. विजापूर) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. १७) दुपारी तो तलावात पोहण्यासाठी गेला होता, मात्र तो घरी परतलाच नाही. शनिवारी दुपारी तलावाच्या पाण्यावर त्याचा मृतदेह तरंगताना आढळला.
संग्रामने सांडव्यावरून तलावात उडी मारली होती. मात्र, पाण्याचा प्रवाह प्रबळ असल्याने आणि दम लागल्याने तो बुडाला, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर संग्रामच्या आई-वडिलांचा हंबरडा हृदयद्रावक होता. संग्रामचे वडील गवंडी म्हणून मजुरीचे काम करतात.
ड्रेनेजमध्ये पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू
पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे ड्रेनेजमध्ये पडून शर्विल सुदर्शन पाटील (वय ५) या बालकाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी वडिलांसोबत तो स्विमिंग टँकवर गेला होता. वडील पोहत असताना शर्विल कठड्यावर खेळत होता. तोल जाऊन तो बाजूच्या अंदाजे दहा फूट खोल ड्रेनेजमध्ये पडला.
काही वेळाने शर्विल दिसेनासा झाल्याचे लक्षात आल्यानंतर शोध घेतला असता ड्रेनेजचे झाकण उघडे दिसले. आत पाहिले असता तो पाण्यात पडलेला दिसला. तत्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या सणात कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनांनी संपूर्ण जिल्हा शोकाकुल झाला आहे.


