मुंबई प्रतिनिधी
गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य मेळावा पार पडला. राज्यभरातील मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख, उपशाखाध्यक्ष आणि मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित होते. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेला भाषणाचा सूर अत्यंत तीव्र होता.
“विधानसभेतील २३२ आमदार निवडून आले, पण राज्यात सन्नाटा होता. मतदारही आवाक झाले, आणि निवडून आलेले आमदारही. हे दृश्य पाहून लोकांना समजलं की, देशात निवडणुका कशा झाल्या,” असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी या वेळी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करताना म्हटलं, “१ जुलैला त्यांनी मतदार यादी बंद केली आणि तब्बल ९६ लाख खोटे मतदार या यादीत भरले, मुंबई, पुणे, गावागावात. अशा निवडणुका म्हणजे जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे. सगळं मॅच फिक्सिंग चाललंय. तुम्ही मतदान द्या किंवा नका देऊ, निकाल आधीच ठरलेला असतो.”
यावर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाशी बोललो, तर सत्ताधाऱ्यांना राग येतोय… कारण त्यांनी शेण खाल्लंय!”

या वक्तव्याने सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली आणि लगेचच जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडीओही दाखवला, ज्यात मोदी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल बोलताना दिसतात.
राज ठाकरे पुढे म्हणाले, “निवडणूक आयोग हा कोणत्याही सत्ताधारी पक्षाचा गुलाम नाही. आम्ही हे सत्य सांगतोय, आणि याचाच राग काहींना येतोय.”
याच दरम्यान त्यांनी मंत्री संदीप भुमरे यांच्या विधानाचाही उल्लेख केला, “भुमरे म्हणाले होते की, त्यांनी बाहेरून २० हजार मतदान आणलं. हे त्यांच्या तोंडूनच बाहेर आलंय. मग विचार करा, राज्यात काय चाललंय.”
राज ठाकरे यांच्या या भाषणाने राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत या वक्तव्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.


