
पुणे प्रतिनिधी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावाकडे जाणाऱ्यांची मोठी गर्दी होत असताना खासगी बसचालकांकडून प्रवाशांकडून मनमानी तिकीटदर आकारल्याच्या तक्रारी दरवर्षी येतात. मात्र, यंदा प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) सज्ज झाला आहे. एसटीच्या अधिकृत तिकीटदराच्या दीडपट इतकाच दर खासगी बसचालकांना आकारता येणार असून त्यापेक्षा अधिक वसुली झाल्यास थेट कारवाई केली जाणार आहे.
आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले, “एसटीपेक्षा दीडपट दर घेण्याचीच परवानगी खासगी बस चालकांना आहे. यापेक्षा अधिक तिकीटदर आकारल्यास संबंधित चालक किंवा मालकावर कठोर कारवाई केली जाईल. तक्रार मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
प्रवाशांना लुटीपासून वाचवण्यासाठी आरटीओने विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे. जास्त तिकीटदर आकारल्यास खालील माध्यमांतून तक्रार करता येईल
तक्रारीसाठी आवश्यक माहिती:
* प्रवाशाचे नाव-
* मोबाईल क्रमांक-
* तिकिटाचा फोटो (पुरावा)-
तक्रार करण्यासाठी:
* हेल्पलाइन क्रमांक: 8275330101
* ई-मेल: rto.12-mh@gov.in
दरम्यान, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनेही आरटीओने काही सूचना केल्या आहेत
वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नका
अनधिकृत ठिकाणी वाहन उभे करू नका
सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवा
दिवाळीच्या गर्दीत आर्थिक शोषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. प्रवाशांनी सजग राहून तक्रारीसह पुरावे सादर केल्यास पारदर्शक आणि सुरक्षित प्रवासाला निश्चितच चालना मिळेल.