
पुणे प्रतिनिधी
राज्यातील कृषी पणन व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यासह सात प्रमुख बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, या निर्णयामुळे अनेकांच्या राजकीय समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांनुसार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्यांना अधिक पारदर्शक आणि स्पर्धात्मक बनविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने “राष्ट्रीय बाजार” या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, लातूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या आठ बाजार समित्यांचा समावेश होणार आहे.
मुंबई बाजार समितीचे संचालक मंडळ यापूर्वीच कालबाह्य झाले असल्याने, उर्वरित सात बाजार समित्यांची विद्यमान मंडळे बरखास्त करण्याची अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे.
प्रशासकीय मंडळाची नवी रचना
या नव्या व्यवस्थेनुसार पणन मंत्री राष्ट्रीय बाजाराचे अध्यक्ष, तर पणन राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील. एकूण अकरा सदस्यीय प्रशासकीय मंडळ स्थापण्यात येणार आहे. त्यात महसूल विभागाचा एक अधिकारी, सहा शेतकरी प्रतिनिधी आणि पाच परवानाधारक व्यापारी असतील. सचिव म्हणून कृषी, पणन, सहकार आणि महसूल विभागाचा अधिकारी नियुक्त होईल. मंडळातील सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार पणन मंत्र्यांकडे असेल.
‘एकीकृत एकच व्यापार परवाना’
या अध्यादेशात “एकीकृत एकच व्यापार परवाना” ही नवी संकल्पना लागू केली जाणार आहे. यामुळे एका परवान्याने व्यापारी संपूर्ण राज्यभर तसेच इतर राज्यांतील ई-प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार करू शकतील. परवाने पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात युनिक आयडी (UID) सह दिले जातील. व्यापाऱ्यांमधील वाद सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही प्रस्तावित आहे.
आधुनिकतेकडे वाटचाल
या निर्णयामुळे राज्यातील बाजार समित्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून राष्ट्रीय पातळीवर कार्यरत होतील. ८० हजार टनांहून अधिक शेतमालाची उलाढाल करणाऱ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीय बाजारपेठेशी थेट जोडणी, मध्यस्थांची संख्या कमी होणे आणि ई-राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) योजनेची प्रभावी अंमलबजावणी शक्य होणार आहे.
राज्य सरकारच्या मते, या बदलामुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळतील, व्यवहार पारदर्शक होतील आणि कृषी व्यापार आधुनिकतेकडे नेणारा हा निर्णय “नवा टप्पा” ठरेल.