
नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि राजकीय पाठबळावर चालणाऱ्या दादागिरीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. सातपूर येथील हॉटेलमधील गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी गँगवर कारवाईचा धडाका लावला असून, गुन्हेगारी जगतात ‘बाॅस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश लोंढे यांच्यासह त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना लोंढे यांना ताब्यात घेतल्याने शहरात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर दोघेही “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला!” असे म्हणत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
या घटनेनंतर काही तासांतच आणखी एका प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील बागूल यांच्यासोबत पक्षात नुकतेच प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात नेत असताना मामाही तेच वाक्य मोठ्याने उच्चारत असल्याने, “बाॅसनंतर नाना, आता मामाही वठणीवर,” अशा शब्दांत नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये लोंढे पिता-पुत्रांची ‘पी.एल. गँग’ बराच काळ दहशत माजवत असल्याची पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. रात्री कामावर जाणाऱ्या किंवा परतणाऱ्या कामगारांना धमकावून पैसे उकळणे, दुकानदारांकडून हप्ते मागणे, विरोध करणाऱ्यांवर हल्ले करणे, अपहरण आणि जीव मारण्याच्या धमक्या देणे, अशा घटनांनी नाशिककरांचा त्रास शिगेला पोहोचला होता.
या पार्श्वभूमीवर सातपूरमधील हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी गुन्ह्याचे जाळे अधिक खोलवर नेले. तपासात प्रकाश लोंढे आणि त्याच्या मुलगा नानाचा सहभाग उघड झाल्याने दोघांना अटक करण्यात आली. याच कारवाईतून “राजकीय छत्राखाली वाढणाऱ्या गुंडगिरीला पोलिसांनी आता आवर घालण्याचा निर्धार केला आहे,” असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, भाजप पदाधिकारी मामा राजवाडे यांनाही एका स्वतंत्र प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या कडक कारवाईनंतर राजवाडे यांनीही “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” अशीच घोषणाबाजी केल्याने संपूर्ण शहरात या वाक्याचीच चर्चा रंगली.
नाशिक पोलिसांनी अलिकडच्या काही दिवसांत सुरू केलेल्या या मोहिमेमुळे औद्योगिक भागात आणि शहरात गुन्हेगारीविरुद्धचा ‘लॉ अँड ऑर्डर’चा बालेकिल्ला उभा राहत असल्याचा दावा पोलिस वर्तुळात केला जात आहे.