
पुणे प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु होत असताना, भाजपनेही संघटन पातळीवर तयारीची गती वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शनिवारी (ता. ११) पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार आणि प्रदेश पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून, पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. बैठक डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे सकाळी १० वाजता होणार असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच मंत्री चंद्रकांत पाटील आदींचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना आता गती मिळाल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रभाग रचना अंतिम झाल्याने जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक स्तरावर तयारीला वेग आला आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता स्थानिक निवडणुकांमध्येही विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. फडणवीस स्वतः थेट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. अलीकडेच जाहीर झालेल्या नवीन जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन या बैठकीत होणार आहे.
सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेने केलेली कामे, जनसंपर्क मोहिमांची स्थिती आणि आगामी निवडणुकांसाठीचा ‘ॲक्शन प्लॅन’ यावरही चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीतून पक्षाचा पुढील रणनीती आराखडा स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.