
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज (९ ऑक्टोबर) पहाटे दोन आलिशान गाड्यांची शर्यत चांगलीच अंगलट आली. पोर्शे आणि बीएमडब्ल्यू या दोन कारमध्ये झालेल्या शर्यतीदरम्यान पोर्शे कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पोर्शे कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवलीहून अंधेरीकडे येत असताना पहाटे अडीचच्या सुमारास पोर्शे आणि बीएमडब्ल्यू कारमध्ये शर्यत सुरू होती. दरम्यान, जोगेश्वरी मेट्रो स्थानकाजवळ पोर्शे कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर आदळली. अपघात इतका भीषण होता की कारने चार-पाच पलट्या घेतल्या आणि अक्षरश, चेंदामेंदा झाला.
सुदैवाने, अपघातावेळी गाडीतले एअरबॅग्ज उघडल्याने चालकाचा जीव वाचला. उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांच्या मदतीने जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, बीएमडब्ल्यू कारचा चालक पोलिसांच्या ताब्यात असून जोगेश्वरी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत दोन्ही कारचा वेग तब्बल १५० किमी प्रतितास इतका असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आता या शर्यतीमागील नेमके कारण आणि अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.