
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुंबई काँग्रेसने आपल्या कार्यकारिणीची मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार मंगळवारी उशिरा रात्री जाहीर करण्यात आलेल्या या यादीत काँग्रेसने कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष अशा अनेक पदांची घोषणा केली.
मुंबई काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीमध्ये १५ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यात काँग्रेस प्रदेश अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, माजी अध्यक्ष भाई जगताप आणि नेते चरणसिंह सप्रा यांचा समावेश आहे.
वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात
या नव्या कार्यकारिणीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे अध्यक्षपद काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसची रणनीती ठरविण्याचे काम या समितीमार्फत होणार असल्याने ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
तिजोरीची जबाबदारी अस्लम शेख यांच्याकडे
पक्षाच्या अर्थकारभाराचा गाभा असलेल्या कोषाध्यक्षपदी माजी मंत्री आणि अल्पसंख्यांक समाजाचे नेते अस्लम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वरीष्ठ उपाध्यक्षपदी आमदार अमीन पटेल, अशोक जाधव, जेमेन डिसुझा आणि शिवाजी सिंह या चौघांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय उपाध्यक्षपदी तब्बल ३४ कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून ज्योती गायकवाड, भूषण पाटील, कालू बुधेलिया आणि मोहसीन हैदर ही काही ठळक नावे आहेत. सचिवपदासाठी ७८ जणांची नियुक्ती करण्यात आली असून २० कार्यकारिणी सदस्यांनाही यात स्थान मिळाले आहे.
प्रमुख प्रवक्तेपदी सचिन सावंत
प्रवक्ते मंडळातही काँग्रेसने महत्त्वाचे बदल केले आहेत. सचिन सावंत यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय शीतल म्हात्रे, आनंद शुक्ला, शकील चौधरी, सुरेशचंद्र राजहंस आणि सय्यद हुसैन या पाच जणांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्षपदी नवे चेहरे
मुंबई काँग्रेसने सहा जिल्हाध्यक्षांचीही घोषणा केली आहे. दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष रवी बावकर, दक्षिण मध्यचे कचरू यादव, उत्तर मध्यचे अर्शद आझमी, उत्तर मुंबईचे राजपात यादव, उत्तर पूर्वचे केतन शाह आणि उत्तर पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्षपद भावना जैन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
मुंबई काँग्रेसने जाहीर केलेली ही जम्बो कार्यकारिणी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या मोर्चेबांधणीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक पातळीवर विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देत काँग्रेसने संघटनशक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.