
मुंबई प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेलं असतानाच, राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेत ७ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदल्यांकडे राजकीयदृष्ट्या मोठ्या हालचाली म्हणून पाहिलं जात आहे.
नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. अशा वेळेला राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढल्याने या निर्णयाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, तसेच महापालिका आणि जिल्हाधिकारी पदांवर मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली विशेष चर्चेत आली आहे. कार्यकाळात विविध निर्णयांमुळे ते वादात राहिले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतरही त्यांना आता नाशिक कुंभमेळ्याची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महामेट्रोचे विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे नागपूरचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
कुणाची कुठे नियुक्ती?
• एम. देवेंद्र सिंह – रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावरून बदली, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव.
• शेखर सिंह – पिंपरी-चिंचवड महापालिकेतून बदली, नाशिक कुंभमेळा आयुक्त.
• जलज शर्मा – नाशिक जिल्हाधिकारीवरून बदली, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त.
• आयुष प्रसाद – जळगाव जिल्हाधिकारीवरून बदली, नाशिक जिल्हाधिकारी.
• रोहन घुगे – ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली, जळगाव जिल्हाधिकारी.
• संजय कोळते – शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईवरून बदली, पुणे साखर आयुक्त.
• मनोज जिंदाल – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली, रत्नागिरी जिल्हाधिकारी.
राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेषत, नाशिक जिल्ह्यातील बदल्यांना कुंभमेळ्याच्या तयारीशी जोडून पाहिलं जातंय. सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीचा भाग म्हणून या हालचाली होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.