
ठाणे प्रतिनिधी
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटात आता बॅनरयुद्ध पेटले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला, आणि याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये आरोप,प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे.
देसाई यांच्या प्रवेशानंतर शरद पवार गटाने शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून टोलेबाजी केली. या बॅनरवर, “एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर नुकसान त्याचे होते, विद्यापीठाचे नाही,” तसेच “डाॅ. जितेंद्र आव्हाड हे विद्यापीठ आहे; ते कार्यकर्ते घडवतात,” असे संदेश लिहून देसाईंवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली.
मात्र या बॅनरला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर मिळाले. कॅडबरी जंक्शन परिसरात लावलेल्या त्यांच्या बॅनरवर, सर्वांनाच ढ ढ म्हणून पक्षचं ढगात गेलायं. पण त्या पक्षाच्या रावणाचा अहंकार काही मोडत नाही,” असा मजकूर झळकवून आमदार जितेंद्र आव्हाडांवर थेट टीका करण्यात आली.
दरम्यान, ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. नुकतेच विक्रम खामकर आणि अनेक पदाधिकारी शरद पवार गट सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले, त्यानंतर सुहास देसाईंचाही पाला बदलला. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत वैचारिक आणि राजकीय वाद उफाळला आहे.
शहरात लावलेल्या या बॅनरयुद्धामुळे ठाणेकरांमध्ये चांगलीच चर्चा रंगली असून, स्थानिक राजकारणाचे तापमान पुन्हा एकदा वाढले आहे.