
नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी उशिरा रात्री तडकाफडकी आदेश काढत १२ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. यात सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, या हालचालीमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात लुटमार, गाड्यांची तोडफोड, सोनसाखळी चोरीसारख्या घटना वाढत होत्या. वाढत्या गुन्हेगारीमुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. खासदार तथा मंत्री दादा भुसे यांच्यासह भाजपाच्या तिन्ही आमदारांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे.
या निर्णयामुळे पोलिस खात्यात प्रचंड चर्चा सुरू झाली असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेची कंबर कसण्यासाठी आयुक्तांनी थेट पावले उचलल्याचे मानले जात आहे.
बदली झालेले अधिकारी
१) मधुकर शिवाजी कड – अंबड पोलीस ठाणे
२) जग्वेंद्रसिंग नवलसिंग राजपूत – गंगापूर पोलीस ठाणे
३) मनोहर रामा कारंडे – अंबड पोलीस ठाणे
४) प्रकाश आत्माराम अहिरे – भद्रकाली पोलीस ठाणे
५) उमेश नानाजी पाटील – सायबर पोलीस ठाणे
६) संतोष बबनराव नरुटे – मुंबईनाका पोलीस ठाणे
७) रणजित पंडीत नलवडे – सातपूर पोलीस ठाणे
८) संजय मारुती पिसे – आडगाव पोलीस ठाणे
९) विश्वास रोहिदास पाटील – एमआयडीसी चुंचाळे चौकी
१०) तृप्ती सोनवणे – इंदिरानगर पोलीस ठाणे
११) तुषार मुरलीधर अढाव – वाहतूक शाखा, युनिट १
१२) रियाज ऐनुद्दीन शेख – वाहतूक शाखा, सातपूर युनिट
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाचे हे पाऊल ठोस असल्याचे मानले जात असले तरी, बदलीमागील राजकीय दडपशाहीवरूनही कानोकानी चर्चा सुरू आहे.