
नवी दिल्ली वृत्तसंस्था
आधारमध्ये सुधारणा किंवा अपडेट करण्यासाठी आता खिशाला अधिक खर्च करावा लागणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन शुल्काची घोषणा केली असून हे दर ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू राहणार आहेत.
नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल यासारख्या लोकसंख्याशास्त्रीय तपशिलांच्या अद्यतनासाठीचे शुल्क आता ७५ रुपये आकारले जाणार आहे. आतापर्यंत हे शुल्क ५० रुपये होते. बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन किंवा फोटो अशा बायोमेट्रिक अद्यतनांसाठी आता १२५ रुपये शुल्क लागू आहे. १ ऑक्टोबर २०२८ पासून ते १५० रुपये होणार आहे. विशेष म्हणजे, लोकसंख्याशास्त्रीय तपशील आणि बायोमेट्रिक तपशील एकत्रित बदलल्यास वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.
कागदपत्रे आणि प्रिंटआउटसाठी वेगळे शुल्क
आधार अपडेटसाठी ओळखपत्र वा पत्त्याचा पुरावा सादर करणे १४ जून २०२६ पर्यंत माय आधार पोर्टलवर मोफत असेल. मात्र नोंदणी केंद्राला प्रत्यक्ष भेट दिल्यास ७५ रुपये द्यावे लागतील. यापूर्वी ते ५० रुपये होते. आधारचा प्रिंटआउट घेण्यासाठी eKYCद्वारे ४० रुपये, तर इतर साधनांद्वारे ५० रुपये आकारले जातील.
मुलांसाठी दिलासा
UIDAI ने मुलांच्या पालकांना मोठा दिलासा दिला आहे.
५ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांचे पहिले बायोमेट्रिक अपडेट मोफत राहील.
१५ ते १७ वर्षे वयोगटातील पहिल्या अपडेटसाठीही शुल्क आकारले जाणार नाही.
७ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या अपडेटसाठी साधारण १२५ रुपये शुल्क असले तरी ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत माफ करण्यात आले आहे.
घरपोच सेवा महागली
नोंदणी केंद्राला भेट देणे शक्य नसल्यास घरपोच आधार सेवा मिळवण्यासाठी ७०० रुपये (जीएसटीसह) आकारले जातील. जर एका घरात एकापेक्षा जास्त लोकांना सेवा घ्यायची असेल तर पहिल्या व्यक्तीसाठी ७०० रुपये, तर प्रत्येक अतिरिक्त व्यक्तीसाठी ३५० रुपये आकारले जातील.
UIDAI च्या या निर्णयामुळे आधारधारकांना त्यांच्या माहितीचे अद्यतन काळजीपूर्वक करावे लागणार आहे. मात्र मुलांसाठी शुल्क माफ केल्याने पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.