
मुंबई प्रतिनिधी
दसऱ्याचा शुभमुहूर्त आणि केंद्र सरकारकडून वाहनांवरील वस्तू-सेवा करात (जीएसटी) झालेली कपात, या दुहेरी संधीचा मोठ्या संख्येने मुंबईकरांनी लाभ घेतला. यंदाच्या दसऱ्यादिवशी तब्बल १० हजार ५४१ नवीन वाहनांची खरेदी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री लक्षणीयरीत्या जास्त असून तब्बल १,४७८ वाहनांनी विक्रीचा आकडा वाढला आहे.
वाहन उद्योगातील मंदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी हा बदल दिलासा देणारा ठरला आहे. विशेषत: लहान कार आणि मध्यमवर्गीयांसाठी परवडणाऱ्या दुचाकींच्या खरेदीत मोठी वाढ दिसून आली.
पूर्वी १२०० सीसीपर्यंतच्या आणि चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या पेट्रोल व सीएनजी चारचाकींवर २८ टक्के जीएसटी व १ टक्का सेस म्हणजेच एकूण २९ टक्के कर आकारला जात होता. तो सरकारने थेट १८ टक्क्यांवर आणला. तसेच ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकींवरील जीएसटीदेखील २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला. परिणामी, वाहनांच्या किमती कमी झाल्या आणि विक्रीला उधाण आले.
यंदा मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चारही आरटीओ विभागांतून एकूण ७,५७९ दुचाकी आणि २,९६२ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. विशेष म्हणजे विद्युत चारचाकी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.
मुंबईतील दसऱ्यादिवशीची वाहन खरेदी (नोंदणी आकडे)
आरटीओ विभाग दुचाकी चारचाकी
ताडदेव २,२४३ ८३५
वडाळा १,६८७ ७२३
अंधेरी १,२८५ ५५४
बोरिवली २,३६४ ८५०