
मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असला तरी आता हवामान खात्याकडून दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत.
मुंबई, ठाणे आणि उपनगर या परिसरात आज (30 सप्टेंबर) कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे नवरात्री उत्सवात गरबा प्रेमींना निर्धास्तपणे जल्लोष करता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तथापि, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ आणि २ ऑक्टोबर रोजी कोकणातील काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात पावसाची तीव्रता कमी होणार आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरात या दोन्ही दिवशी आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकंदरीत, राज्यभरातील नागरिकांना पावसातून लवकरच दिलासा मिळणार असून नवरात्री उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळण्याची शक्यता आहे.